धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, धाराशिव च्या वतीने खास महिला भगिनींसाठी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन संयोजक गझलकार युवराज नळे यांनी केले होते. डॉ अस्मिता बुरगुटे या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या. कवी संमेलनाच्या निमित्ताने समस्त स्त्री वर्गाच्या भाव भावना आणि समस्या ऐरणीवर आल्या. डॉ अस्मिता बुरगुटे यांनी "स्त्रीच्या दुसऱ्या मनास जर लिहिण्याची मुभा असती, तर स्त्री साहित्याची उंची नक्कीच वेगळी असती" ही रचना सादर करून समस्त स्त्री जगताच्या होणाऱ्या कोंडमारावर प्रकाश टाकला. तर मुंबई येथील कवयित्री तथा कोकण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ मनीषा देवगुणे यांनी "लाडकी माझी लेक जणू चांदणं टिपूर, चांदरातीला उगवली जशी नवी चंद्रकोर" ही कविता सादर करून माय लेकीच्या संबंधातील गोडवा अधोरेखित केला. मीना महामुनी यांनी "मुलगी म्हणून दुबळी समजू नका तिला" या गझलेतून स्त्रीशक्तीची जाणीव करून दिली. सोलापूर येथील सीमा पाटील यांनी "आई तू बहीण तू प्रेयसी तू" ही कविता सादर करून स्त्रीच्या विविध भूमिकांचे महत्व स्पष्ट केले , तर भूम येथील प्रा अलका सपकाळ यांनी "ज्या आभाळावर हक्क सांगतोस ते तुझं थोडं आभाळ मला दे" ही भावगर्भ कविता सादर करून मंत्रमुग्ध केले. पुणे येथील मधुरा कर्वे यांनी "ती जर नसती तर" ही कविता सादर करून स्त्री महत्त्वाचे वर्णन केले. तर धाराशिव येथील ॲड जयश्री तेरकर यांनी "रोज बलात्कार रोजच मरण, कुठे गेली मानवता शरण" ही कविता सादर करून भयावह परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवले. विविध जिल्ह्यातील या कवयित्रींनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वैचारिक स्त्री जागर केला.