धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी प्रस्तावित जागेऐवजी इतरत्र सोयीची व सलग जागा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती. अखेर या मागणीला यश मिळाले आहे. परंतु मंजुरी मिळून चार वर्षे उलटली तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. तुळजापूर रोडवरील भाई उद्धवराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची जागा इमारतीसाठी प्रस्तावित आहे. वास्तविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जागा शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेस तर जलसंपदा विभागाची जागा महामार्गाच्या पूर्वेस आहे.

दोन्ही जागांच्या मधून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे ही जागा सोयीची वाटत नाही. त्याऐवजी सलग जागा उपलब्ध करुन घेतल्यास इमारत बांधकाम आणि रुग्णांची सोय आणि पार्किंगची समस्याही मार्गी लागू शकते. विशेष म्हणजे सध्या प्रस्तावित असलेल्या जागेमुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला जागा अपुरी पडू शकते. तसेच जलसंपदा विभागाच्या जागेलगत वास्तव्यास असलेली कुटुंबे आणि लहान-सहान व्यावसायिकांना अडचण येऊ शकते. या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास परिसरातील कुटुंबांसह व्यावसायिकांची गैरसोय तर होणार आहेच, परंतु वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात मेडिकल व इतर दुकाने उभारण्यास जागा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या तरी ही जागा सोयीची दिसत नाही.

धाराशिव शहरालगत कौडगाव रोडवर असलेल्या वतन जमिनी आणि धाराशिव लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन उपलब्ध आहे. ही जागा सलगपणे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अशा जागेवर इमारत बांधण्यास कोणताही अडथळा येणार नाही. तसेच रुग्णांची गैरसोय देखील होणार नाही. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत शहरालगत असलेल्या मोकळ्या जागांवर उभारणी करणे सोयीचे होईल. म्हणून या निवेदनाचा विचार करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीसाठी इतर जागेचा पर्याय शोधावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, मिलिंद चांडगे, हरिदास शिंदे, दिनेश बंडगर, इलियास मुजावर, अ‍ॅड. बुद्धभूषण माने, संजय थोरात, अनिरुद्ध कावळे, विनोद कदम, प्रशांत कांबळे, सम्राट वाघमारे, बंटी मुंडे, रणजित बनसोडे, संजय थोरात, सम्राट वाघमारे, अनंत दहिहंडे आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top