धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्रंथालय ही खऱ्या अर्थाने गावची सांस्कृतिक केंद्रे असून यामधील विविध लेखकांची पुस्तके वाचून अनेकजण प्रेरित होतात.मात्र,हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वाचक संख्या कमी होत चालली असून ही अतिशय गंभीर बाब आहे.त्यामुळे ग्रंथालयांनी ई-बुक्स तयार करून वाचन संस्कृती टिकवावी.पुस्तके म्हणजेच ग्रंथ हे सोशल मीडियावर अँटिबायोटिक म्हणून काम करीत असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे विभागाचे सहायक संचालक सुनील हुसे यांनी केले.

धाराशिव येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन 24 व 25 मार्च रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे. धाराशिव ग्रंथोत्सव -2024 चे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटक म्हणून बोलतांना हुसे म्हणाले की,जिल्ह्यातील लेखकांनी प्रकाशित केलेली पुस्तके जिल्ह्यातील प्रत्येक ग्रंथालयामध्ये ठेवलीच पाहिजेत.त्यामुळे स्थानिक साहित्यकांचे लिखाण वाचून वाचकांना वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रंथदिंडीचे पूजन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी खडसे म्हणाले की, पुस्तक वाचनामुळे समाजामध्ये जे-जे मतभेद व भेदभाव असतात ते मिटविण्याचे काम ग्रंथ करतात. चांगल्या साहित्यिक व लेखकांचे साहित्य वाचावे. संस्कृती कशी वाढेल ती कशी टिकेल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुर्यवंशी व साहित्यिक युवराज नळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कलाशिक्षक शेषनाथ वाघ व त्यांच्या चमूने जय जय महाराष्ट्र माझा... हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता ॲड. चौगुले यांनी पसायदानाने केली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले. तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गोरखनाथ कानडे यांनी मांनले. या दिंडीत अनेकांचा सहभाग होता.

 
Top