परंडा (प्रतिनिधी)-  परंडा-पाथरूड राज्य महामार्ग क्रमांक 210 ची अत्यंत दुरवस्था झाली असून, वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या उदासीनतेच्या निषेधार्थ आणि रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सोनारी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 6 जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बेमुदत ‌‘रस्ता रोको‌’ करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. 

प्रशासनाने येत्या 5 दिवसांत (6 जानेवारीपर्यंत) या निवेदनाची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्यथा, समस्त सोनारी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान होणाऱ्या परिणामांना पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना रवी मांडवे, सचिन पवार, अविनाश हांगे, गणेश फले हे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव, तहसीलदार परंडा आणि आंबी पोलीस स्टेशन यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.

मौजे सोनारी येथील शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि धोकादायक झाली आहे. सोनारी हे ठिकाण श्री काळ भैरवनाथ तीर्थक्षेत्र असल्याने येथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित विभागाला वारंवार प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सद्यस्थितीत ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने साखर कारखान्यांची अवजड वाहने याच मार्गावरून धावतात. हा मार्ग अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख दुवा असूनही प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासनाला जागे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग परंडा येथे 1 जानेवारी 2026 रोजी हे निवेदन देण्यात आले. “जर या धोकादायक रस्त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात झाला, तर त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल आणि संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,“ असा आक्रमक पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे.

 
Top