धाराशिव (प्रतिनिधी)- गुढीपाडवा तसेच नवीन संवत्सर हिंदू नववर्ष शुभारंभ निमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी धाराशिव शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती.या रॅलीची सुरुवात मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोरील महात्मा बसवेश्वर चौकातून झाली. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
महात्मा बसवेश्वर चौकातून ही बाईक रॅली राजमाता जिजाऊ चौक येथे दाखल झाली. त्यानंतर संत गाडगेबाबा चौक मार्गे काळा मारुती चौकातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली होती.बाईकवर भगवे झेंडे तसेच भगवे फेटे परिधान केलेले दुचाकी वाहनचालक यामुळे वातावरण भगवे झाले होते. तसेच प्रभू रामचंद्र की जय..... सियावर रामचंद्र की जय......श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ........जय जिजाऊ जय शिवराय........ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
या बाईक रॅली दरम्यान राजमाता जिजाऊ यांच्या चौकात पूजन करण्यात आले. तसेच हिंदू धर्म पालक हिंदूंचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या बाईक रॅलीत मध्यवर्ती शिवजयंती समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे,माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक ॲड. रवींद्र कदम, जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख, सहाय्यक सरकारी वकील सचिन सूर्यवंशी, भाजपा नेते विनोद गपाट, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, नगरसेवक अभिजीत काकडे, दाजी पवार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक तसेच शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी, शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी, सकल हिंदू समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.