धाराशिव (प्रतिनिधी)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या पथकाने कर वसुलीसाठी तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये काही वाहने अटकावून ठेवली आहेत.ही वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पोलीस स्टेशन,एसटी बस डेपो आदी ठिकाणी पार्क करण्यात आली आहे.ती मालक,चालक किंवा वित्तदाते यांच्या जबाबदारीवर सोडविली जाऊ शकतात.
वाहन सोडवण्यासाठी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून थकीत कर,दंड,तडजोड शुल्क व पर्यावरण कर भरावा लागेल.तथापि, सध्या 73 वाहने अनेक महिन्यांपासून वरील ठिकाणी उभी असून,त्यांचे मालक किंवा संबंधित व्यक्तींनी संपर्क साधलेला नाही.
या वाहनांवर कोणीही हक्क सांगितला नाही,त्यामुळे शासनाने त्यांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अशा वाहनांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.पुढील 30 दिवसांत संबंधितांनी संपर्क करून कर आणि शुल्क भरून वाहन सोडवून नेणे गरजेचे आहे.
जर ठराविक मुदतीत कोणीही वाहनाचा दावा केला नाही,तर त्या वाहनांना बेवारस समजून सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीने त्यांचा जाहीर लिलाव केला जाईल. लिलावाद्वारे मिळणारी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाईल,तसेच जागा रिक्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल.
15 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा वापरण्यायोग्य नसलेल्या वाहनांचा लिलाव mstcindia.co.in वर होईल.लिलावाची तारीख,वेळ व स्थळ याची माहिती वरील संकेतस्थळांवर तसेच कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल.
वाहन मालकांसाठी अंतिम संधी
वाहने अनेक महिन्यांपासून एका ठिकाणी उभी असल्याने त्यांचे मूल्य कमी होण्याची शक्यता आहे.तसेच, वाहनातून पेट्रोल/डिझेल गळती होऊन अपघात किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.प्रशासनावर अतिरिक्त ताण येत असल्याने संबंधित वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी 30 दिवसांच्या आत संपर्क साधून त्यांचे वाहन सोडवून घ्यावे.अन्यथा, शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे.