धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वन्यप्राणी वाघाचा वावर आढळून आला आहे.हा वाघ विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून स्थलांतरित झाला असण्याची शक्यता आहे.त्याचा वावर जिल्ह्यातील भूम,वाशी,कळंब,परंडा, येडशी-रामलिंग घाट अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वन परिक्षेत्रात दिसून येत आहे.वन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार हा नर वाघ सुमारे 2-3 वर्षांचा आहे.


मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचा वन विभागाचा प्रयत्न

या भागातील जंगलक्षेत्र हे विखुरलेल्या स्वरूपाचे असून, वाघासाठी पुरेसा अधिवास आणि खाद्यसाखळी उपलब्ध नाही.त्यामुळे तो शेती व खाजगी मालकीच्या जमिनीत वावरताना दिसून आला आहे. आतापर्यंत वाघाने 20 ते 25 पशुधनाचा फडशा पाडला आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वन विभागाने तज्ज्ञ समिती गठीत केली आहे.26 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत नर वाघाला सुरक्षितरित्या जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात किंवा बचाव केंद्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयास 10 जानेवारी 2025 रोजी मुख्य वन्यजीव रक्षक, नागपूर यांनी मंजुरी दिली.त्यानुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद बचाव दलास वाघ पकडण्याची जबाबदारी देण्यात आली.

13 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत ताडोबा जलद बचाव दलाने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी वाघ शोधण्याचे प्रयत्न केले.धामणगाव, म्हासोबाची वाडी,कडकणयावाडी आणि उक्कडगाव परिसरात पगमार्क व हालचालींचा मागोवा घेतला गेला. मात्र,वाघ जेरबंद करण्यात यश आले नाही.ताडोबा बचाव दलाच्या इतर ठिकाणी तातडीच्या गरजा असल्याने त्यांनी मोहिमेतून माघार घेतली.

त्यानंतर 20 जानेवारी रोजी   बावधन (पुणे) येथील पथक वाघ जेरबंद करण्यासाठी दाखल झाले.सध्या ड्रोन,डॉग स्क्वाड,ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह सीसीटीव्ही यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.आतापर्यंत तीन वेळा वाघावर बेशुद्ध करणारे डार्ट मारण्यात आले, परंतु वेळेअभावी किंवा अन्य कारणांमुळे तो जेरबंद होऊ शकला नाही.

वन विभागाने वाघ जेरबंद होईपर्यंत गहन देखरेख सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मानवी हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे आणि सुरक्षित अंतर राखावे,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.संभाव्य धोका लक्षात घेता,धाराशिव वीज वितरण कंपनीला ग्रामीण भागात दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. वाघाला सुरक्षितरित्या जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि सहकार्य करावे,असे आवाहन धाराशिवचे विभागीय वन अधिकारी बी.ए.पोळ यांनी केले आहे.

 
Top