धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव च्या वतीने होळीच्या निमित्ताने जेष्ठ गझलकार भागवत घेवारे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या 'रंग होळीचे' या काव्य मैफिली मध्ये विविध विषयांवरील कवितांनी मैफिल अगदी शब्द रंगाने रंगून गेली.
या कवी संमेलनाचे अध्यक्षपद रवींद्र शिंदे यांनी भूषविले. या काव्य मैफिलीत सहभागी जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे यांनी फुलांवरील बाल कविता सादर करून निसर्ग सौंदर्याच्या एक वेगळ्याच विश्वात मानवी मनाला भटकंतीस नेहण्याचे काम केले. तसेच भागवत घेवारे यांनी आपल्या हास्य विनोदी कविताने हास्याचा रंग प्रत्येकांच्या ओठांवर उमटविण्याचे काम केले. युवराज नळे यांच्या 'वेदना मैत्रीण माझी छानशी आहे' या कवितेने स्वतःच्या भावविश्वातील भावना मांडण्याचे काम केले. मीना महामुनी, ॲड जयश्री तेरकर, युसूफ सय्यद, अश्विनी धाट, तुकाराम गंगावणे, सुषमा सांगळे यांनी आपल्या बहारदार कवितांनी आपल्या काव्य रंगांची उधळण केली. कवी संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी सर्व रचनांचा आढावा घेत 'सामर्थ्य नसे ज्या रक्तात जीवन त्याचे व्यर्थ असे' ही आशयगर्भ कविता सादर केली. या प्रसंगी सुरेश शेळके, ॲड नामदेव तेरकर, राजाभाऊ कारंडे, कुलकर्णी यांच्यासह अनेक श्रोत्यांनी या 'रंग होळीचे' कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. सूत्रसंचालन भागवत घेवारे यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश शेळके यांनी केले.