कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंबचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयात सपत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक, पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी अण्णा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एम. डी. देशमुख ज्येष्ठ शिक्षणतज्ञ म्हणाले की, डॉ. सुनील पवार यांनी अध्यापक म्हणून तर नावलौकिक मिळवलाच.सोबत प्राचार्य म्हणून काम करताना योग्य न्याय दिला. त्यामुळे प्राचार्य डॉ. सुनील पवार म्हणजे शैक्षणिक कार्याचे उत्तम व्यवस्थापक असल्याचा गौरव केला. तसेच सेवानिवृत्तीनंतर अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेचा भाग बनावे असे आवाहन केले. सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या प्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी पवार यांनी सुरुवातीपासूनच अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने काम केले. विशेषतः उत्कृष्ट सूत्रसंचालक, प्रशासक, शिक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले.
यावेळी शिक्षण महर्षी वसंतराव काळे महाविद्यालय ढोकीचे प्राचार्य डॉ.हरिदास फेरे यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव केला. विशेषतः विद्यापीठाच्या प्राधिकरणावर, महाविद्यालय मूल्यांकन कमिटीमध्ये प्राचार्य सदस्य म्हणून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संचालक डॉ.संजय कांबळे, उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, डॉ. दत्ता साकोळे, प्रा. डॉ. अमोल कल्याणकर, प्रा. नितीन अंकुशराव, माजी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एस.व्ही.पाटील, साक्षी पवार गुंडगुळे यांनी पवार यांचे विविध पैलू उलगडून दाखवले. तसेच भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल यांनी सुनील पवार यांनी प्राचार्य म्हणून केलेले काम निश्चितच पदाला न्याय देणारे ठरले. त्यामुळे यशस्वी प्राचार्य म्हणून त्यांची नोंद घेतली पाहिजे असे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. सुनील पवार व सौ.सुजाता सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुनील पवार यांनी संस्थेने कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक ते प्राचार्य जी संधी दिली, जो विश्वास टाकला त्याला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. माझ्या वाटचालीत, कौटुंबिक अडचणीत देखील या संस्थेने सहकार्यांनी फार मोठे पाठबळ दिले. त्यामुळे मी प्रभावी सेवा करू शकलो. संस्थेच्या प्रती ऋणाचा भाव प्रकट केला. यावेळी विचारपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. अंकुश पाटील, संस्थेचे संचालक डॉ. डी. एस जाधव, प्रा. वसंतराव मडके, अंजली मोहेकर, किशोर पवार व सौ गुंडगुळे, जावई गणेश गुंडगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक, ज्येष्ठ नागरिक, नातेवाईक, रोटरी क्लब कळंब सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक हनुमंत जाधव,प्रभारी प्रा. ईश्वर राठोड व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ.दादाराव गुंडरे यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी मानले.