धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मौजे ढोकी येथे उद्भवलेल्या बर्ड फ्लू प्रकरणाच्या पाहणीसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले पशुधन अधिकारी डॉ. विवेक सरोज यांनी आज बाधित क्षेत्राला भेट दिली.या पाहणीदरम्यान त्यांनी मृत पक्षी आढळलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट कशी लावली जात आहे, याचा आढावा घेतला.
यावेळी पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत,आरोग्य विभाग, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करून डॉ. सरोज यांनी समाधान व्यक्त केले आणि काही आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी बाधित परिसरातील कुक्कुटपालकांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली आणि पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या भेटीप्रसंगी प्रादेशिक पशुसंवर्धन सहयुक्त,लातूर विभाग डॉ.सोनवणे, धाराशिव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.वाय.बी.पुजारी ,नांदेडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजकुमार पडिले,लातूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्रीधर शिंदे,जलद प्रतिसाद दलातील डॉ.तावरे (सहाय्यक आयुक्त,पशुसंवर्धन धाराशिव) तसेच धाराशिव व ढोकी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. शेळके,डॉ.पाटील,आणि डॉ. टेकाळे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या निरीक्षणानंतर बाधित क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असून,प्रशासनाने अधिक दक्षता बाळगावी आणि प्रतिबंधात्मक उपाय आणखी प्रभावीपणे राबवावेत,अशा सूचनाही देण्यात आल्या.