धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करत हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा पोकळ बाजार असल्याचे म्हटले आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या आश्वासनांचा पाऊस पाडला होता, मात्र उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्या आश्वासनांची कोणतीही तरतूद नाही, असा आरोप त्यांनी केला.

महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते, मात्र अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून दहा लाख उद्योजक घडवण्याच्या घोषणेचीही अंमलबजावणी नाही. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

शेतकऱ्यांसाठीही हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विकासासाठी 45,000 गावांमध्ये पांदन रस्ते बांधण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र त्याचीही कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करून सत्तेत आल्यावर त्यांचा विसर पडणे, हाच महायुतीचा अजेंडा असल्याचे सांगताना “हा अर्थसंकल्प म्हणजे 'लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही'“ असे स्पष्ट मत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले.


 
Top