धाराशिव (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) व नाबार्ड यांच्या सहकार्याने राबवलेल्या आदर्श वडगाव (लाख) पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची जिल्हाधिकारी श्री किर्ती किरण पुजार यांनी 10 मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली.
या प्रकल्पाअंतर्गत जलसंधारणासाठी सीसीटी,गल्ली प्लग,सिमेंट बंधारे, साठवण तलाव तसेच वृक्षलागवड यासारखी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या पाहणीस तहसीलदार अरविंद बोळंगे,वरिष्ठ भूवैज्ञानिक सी.डी. चव्हाण,टीसचे कॅम्पस संचालक प्रो. बाळ राक्षसे,तसेच डॉ.संपत काळे, गणेश चादरे, देविदास कदम, शंकर ठाकरे,आनंद भालेराव,डॉ. दयानंद वाघमारे,मनोहर दावणे यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले,धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी,शेती आणि पर्यटन ही त्रिसुत्री अत्यंत महत्त्वाची आहे.पाणलोट क्षेत्रातील योजनांमुळे गावाचा विकास अधिक प्रभावीपणे साधता येईल. शेतीपूरक व्यवसायांसाठी शेळीपालन,कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय यासारख्या उपक्रमांना चालना देणे गरजेचे आहे.या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.असे ते म्हणाले.
पुजार यांनी गावाच्या विकासासाठी टीस व कोहिजन फाउंडेशन यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक सय्यद यांनी केले.आभार गणेश चादरे यांनी मानले