धाराशिव (प्रतिनिधी)- मालमत्ता कराचा भरणा सात दिवसांच्या आत करावा. अन्यथा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करून कर वसुली करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दि. 4 मार्च रोजी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही करांचा भरणा केलेला नाही, त्यांनी कराचा तत्काळ भरणा करावा. जे मालमत्ताधारक सात दिवसांच्या आत कराचा भरणा करणार नाहीत अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करून मालमत्ता व अन्य करांची वसुली करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. शिवाय नळजोडणी खंडित करण्यात येवून त्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येतील. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही नागरिकांना कराचा भरणा करता यावा, यासाठी कार्यालय सुरू राहील. शहरातील मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील कराचा भरणा करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी केले आहे. पालिका प्रशासनाकडून मालमत्ता कराची वसुली मोहिम सुरू आहे. थकबाकीदारांची संख्या मोठी असल्याने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही मार्चअखेरपूर्वी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.