तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील सिंदफळ शिवारात अज्ञात कारणावरून 55 वर्षीय शेतकऱ्याचा त्याच्या शेतामध्ये स्टीलच्या रोडने मारुन  खून करण्यात आल्याची घटना दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांवर खुनाचा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील बार्शी रोडवरील सिंदफळ शिवारातील मयत सत्तार यासीम इनामदार यांची शेती असून, दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये असलेल्या विहिरीतील मोटर चालू करण्याकरता गेले. परत शेतामधून वापस न आल्यामुळे मयत यांचा मुलगा सोहेल यांनी शेतामध्ये जाऊन बघितले असता मयत यांच्या डोक्यामध्ये मोटरसायकलच्या शॉकअपसरच्या स्टीलच्या रोडने मारहाण केल्याचे निदर्शनास आले. तात्काळ त्यांना  उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे दाखल केले. गंभीर प्रकृती पाहता त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी सत्तार यासीम इनामदार यांना मयत घोषित केले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे वसीम गफुर ईनामदार वय 35 वर्ष, धंदा शेती रा. सिंदफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गणेश घाटशिळे रा. सिंदफळ व त्याचे दोन साथीदार असे तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल मांजरे हे करत आहेत. सदर खुन कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे मात्र पोलीस तपासामध्ये सिद्ध होणार आहे.

 
Top