नळदुर्ग (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या शेतीला पूरवठा करण्यात येणारा रात्रीचा विजपुरवठा बंद करुन तो दिवसा देण्यात यावा. अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. कारण रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना बिबटया सारख्या रानटी जनावरांची भीती बसली आहे. या भीतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात आपल्या पिकांना पाणी सोडण्यासाठी जाताना दहा वेळा विचार करीत आहे. कोणी कडून बिबटया येईल आणि शेतकऱ्यांवर हल्ला करील याचा कांही ही नेम सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आणि महाविरतण कंपनीने विचार करुन तात्काळ एक आठवडा जो शेतकऱ्यांच्या वीजपंपाना रात्रीचा विजपुरवठा केला जातो तो बंद करुन दिवसा देण्यात यावा. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तुळजापूर तालुक्यात गेल्या एक दोन महीन्यापासून बिबटया आल्याच्या चर्चाना उधान आले आहे. तशातच वनविभागाच्या कॅमेऱ्या मध्ये वाघ दिसल्याचे निदर्शनास आले आहे. असे असताना वन विभागाला हा वाघ पकडता येत नाही. शिवाय तालुक्यात बिबटया आल्याच्या ही चर्चा मोठया प्रमाणात होत आहेत. गेल्याच महीन्यात मुर्टा होर्टी परिसरात बिबटया आल्याच्या चर्चा होत्या. तर काल परवा नळदुर्गपासून जवळच असलेल्या कंदूरमळा शिवारात ही बिबटया आल्याची चर्चा आहे. शिवाय या अनेक पशुधन ही बिबटया सारख्या प्राण्याकडून मारले गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता चिंतातुर झाला आहे. सध्या शेतकऱ्यांचे रब्बी पिके, गहू, ज्वारी, हरभरा या शिवाय उस ही पिके शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली आहेत. त्यामुळे या पिकांना पाणी सोडणे गरजेचे आहे.
त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतामध्ये पाणी देत असताना अंधारात कोणत्याही प्राण्याचा माग मोस लागत नाही. एखादा हिंस्त्र प्राणी येवून शेतकऱ्यांना दगा फटका होवू नये यासाठी शेतकऱ्यांच्या वीज पंपाला दिवसा वीजपुरवठा केला तर शेतकऱ्यांसाठी तो सोईचा होवू शकतो. त्यामुळे महावितरण कंपनी आणि प्रशासनाने या बाबीचा विचार करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.