धाराशिव (प्रतिनिधी)- एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी तिप्पट रक्कम वसूल केली जात आहे. ती त्वरित रद्द करून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे धाराशिव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, वाहनाची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एचएसआरपी मान्यता प्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केलेले आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिकांकडून इतर राज्याच्या तुलनेत नंबर प्लेटची किंमत तिप्पटीने वसूल केली जात आहे. सदरची अवाजवी रक्कम रद्द करून सर्वसामान्य माणसाला परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. तसेच यापूर्वी ज्या वाहनधारकांनी ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरून सदरची एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली आहे. त्यांना जे दर नियमित होतील त्यातून जास्तीची रक्कम परत करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून दुधगावकर यांनी केली आहे.

 
Top