कळंब (प्रतिनिधी)- राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे एस.टी. कर्मचाऱ्यांची निरनिराळी अनेक आर्थिक मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. तसेच थकबाकी वारंवार मागणी करूनही मिळत नसल्यामुळे नाराजी निर्माण झालेली आहे कामगारांना देय असलेल्या वाढीव वेतनाच्या थकबाकीमध्ये खंड पडू नये यासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 रोजी कालावधीची देय होणारी थकबाकी व अन्य प्रलंबित देणी देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने 5 मार्च रोजी राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व आगार, विभागासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

2018 पासूनची महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असूनही सदरची थकबाकी अद्याप कामगारांना मिळालेली नाही. 2016-2020 या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ कामगारांना लागू करताना घरभाडे भत्याचा दर 8,16, 24 टक्क्यांऐवजी 7,14, 21 टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्क्यांऐवजी 2 टक्के असा एकतर्फी कमी केलेला होता. तथापि, माहे नोव्हेंबर 2021 पासून सदरचा वाढीव दर कामगारांना लागू केलेला असून माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीची घरभाडे भत्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी एस.टी प्रशासनाकडे प्रलंबित आहे. सर्व प्रलंबित थकबाकी रक्कमेच्या अधिन राहून कामगारांना सध्या मिळत असलेल्या वाढीव थकवाकीची रक्कम पुढे तशीच सुरू ठेवावी. अशी मागणी करण्यात आली आहे जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर 5 मार्च रोजी राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व आगार विभागा समोर निदर्शने करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी दिली आहे.


 
Top