धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक 28 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली.या बैठकीत उप कार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.2,उमरगा यांनी तुळजापूर तालुक्यातील येमाई ल.पा. प्रकल्प, मंगरुळ ल.पा. प्रकल्प, आरळी ल.पा.प्रकल्प आणि केमवाडी सा.त.प्रकल्प या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्याने आणि या प्रकल्पांवरील पाणीपुरवठा योजनांचा विचार करता,पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणले.
यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालातही या प्रकल्पांतील पाणीपातळी चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.तसेच,सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचा अवैध उपसा होऊ नये,पाणीपुरवठा योजना सुरळीत चालाव्यात आणि जनावरांसाठीही पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे,यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या चारही प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील आदेश येईपर्यंत फक्त पिण्यासाठीच वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.जलसाठा नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवावे,असेही निर्देश देण्यात आले आहेत.