उमरगा (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील नांदेड डेपोची एसटी बस कर्नाटक राज्यात गेली असता गाडीचे नंबरप्लेट, महामंडळाच्या लोगोवर काळे लावून गाडीवर कर्नाटकचा झेंडा लावल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. सदर गाडी उमरगा बसस्थानकात आल्यानंतर चालक व बस स्थानक प्रमुखाशी चर्चा करुन वाहकाचे म्हणणे लेखी घेण्यात आले.
याबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले की, नांदेड डेपोची एस टी बस कलबुर्गी - नांदेड एम. एच. 20 बीएल 2224 ही शनिवारी कलबुर्गीला गेली होती. ती आळंद मार्गे उमरगा शहराकडे येत असताना गाडी आळंद शहरालगतचे चेकपोस्टवर आली असता शनिवारी (दि.1) सायंकाळी पाच वाजता तेथे 25 ते 30 समाजकंटक सायं 5 वाजता आले. चालक व वाहकाला शाल घालण्यात आली. जय कर्नाटक, कर्नाटक जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या गाडीच्या नंबर प्लेट, समोरील काचेवर व गाडीच्या समोर व दोन्ही बाजुला कन्नडमध्ये जय कर्नाटक हा मजकूर लिहिण्यात आला आहे. बस सायंकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान उमरगा डेपोत आली. चालक व वाहक बस स्थानक प्रमुखशी चर्चा करुन घडलेल्या घटनेची वाहक व चालकांचे लेखी म्हणणे घेण्यात आले. घडलेल्या घटनेची माहिती वरीष्ठांना लेखी स्वरूपात कळवण्यात येणार असून, याची पोलिसांत कोणतीही लेखी तक्रार देणार नसल्याचे बस स्थानक प्रमुख अभिमन्यू सरवदे यांनी सांगितले.