धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी आज (दि. 24) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये नगरपालिकेच्या महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदांची निवड प्रक्रिया पार पडली. दुपारी 2 ते 4 या वेळेत गटनेत्यांकडून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती.

निवडायच्या सभापतींच्या संख्येइतकीच नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्यामुळे सर्व निवडी बिनविरोध झाल्या. या निवड प्रक्रियेत आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून वैशाली सुशांत सोनवणे यांची, तर उपसभापती म्हणून दीपाली धनंजय पाटील यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजित काकडे यांची निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या अध्यक्षपदी विलास मारुती लोंढे यांची, तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण माळी यांची निवड करण्यात आली. याचबरोबर नियोजन व विकास समितीच्या अध्यक्षपदी आकाश तावडे यांची निवड करण्यात आली आहे. या विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे उपस्थित होते.

तसेच नगराध्यक्षा नेहाताई काकडे आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांचीही उपस्थिती होती. मात्र या बैठकीला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गैरहजेरी लावली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नगराध्यक्षा नेहा काकडे या पाहणार असून, स्थायी समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून अमित शिंदे, अभिजित पतंगे आणि शेख इस्माईल यांची निवड करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या शहर विकासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषय समित्यांच्या निवडी पूर्ण झाल्यामुळे आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा धाराशिव शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


 
Top