धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व धनंजय सावंत अपक्ष म्हणून जिल्हा परिषदच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दुधगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे माजी मंत्री शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात मतभेद झाल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. संजय पाटील दुधगावकर हे कळंब तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उभारले आहेत. तर धनंजय सावंत हे परंडा तालुक्यातील जवळा व डोंजा गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात अजून एक पुतण्या काकापासून दूर गेला आहे. 

यासोबतच माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत उपाध्यक्ष होते. ते सध्या परंडा तालुक्यातील जवळा व डोंजा गटातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सावंत यांच्याबरोबर सुत न जमल्यामुळे त्यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळालेली नाही. गेल्या टर्ममध्ये सुरूवातीचे अडीच वर्षे अध्यक्षपद उपभोगेलेले नेताजी पाटील यांना तर गटाबरोबर पक्षही बदलावा लागला आहे. वडगाव (सि.) गटातून ते पूर्वी सदस्य होते. नंतर ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये गेले होते. त्यांना आता पक्ष बदलून शिवसेनेकडून (शिंदे गट) पळसप गटातून निवडणूक लढवावी लागत आहे. त्यावेळच्या उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यावेळीचे विरोधी पक्षनेते शरद पाटील यांनीही अशीच भूमिका सांगत ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 

कळंब तालुक्यातील नायगाव गटातून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर कोणत्याच पक्षात प्रवेश घेतलेला नाही. माजी सदस्य संदिप मडके ईटकूर गणातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मातोश्री मोहा गटातून रिंगणात आहेत. परंडा तालुक्यातील माजी सभापती आवेदाबाई जगताप यांचे पुत्र नवनाथ जगताप शिंदे गटाकडून रिंगणात आहेत. तुळजापूर तालुक्यातील अणूदर गटातून माजी सदस्य दीपक आलुरे, तर जळकोटमधून प्रकाश चव्हाण रिंगणात आहेत. लोहारा तालुक्यातून पुन्हा अश्विनी दीपक जवळगे, शोभा शामसुंदर तोरवडे तसेच लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती असिफ मुल्ला यांच्या पत्नी कोमल भालेराव रिंगणात आहेत. माकणी गटातून शितल राहुल पाटील पुन्हा निवडणूक लढवत आहेत. 

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी धाराशिव तालुक्यातून 12 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. अन्य तालुक्यात एक ते दोन किरकोळ स्वरूपात अर्ज मागे घेणयात आले आहेत. मात्र 27 जानेवारीपर्यंत सर्व अपक्षांची व स्वतःला धोकादायक ठरणाऱ्या उमेदवारांची मनूरणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अपक्षांची संख्या अधिक असल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला अडचणी येवू शकतात. 

 
Top