धाराशिव,(प्रतिनिधी)- नगर परिषदेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात येत आहे. या कामास नागरिकांमधून तीव्र विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे येथे शौचालय बांधकाम करण्यात येऊ नये अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील जागेवर जेथील जागा वाहन तळासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे तेथे सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक पुतळ्याच्या पूर्व बाजुला आधीच सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेले आहे. त्याची दक्षता घेतली जात नाही. त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट घालणे म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप नगर परिषद करत आहे. त्यामुळे इथे नागरिकांना घाणीचा व दुर्गंधीचा दररोज मुकाबला करावा लागणार आहे. म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार येथील सार्वजिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, उमेश राजेनिंबाळकर, काकडे, सरडे, देडे यांची स्वाक्षरी आहे.