धाराशिव (प्रतिनिधी)- नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगरपालिकेस मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या 59 डीपी रस्त्यांची कामे कंत्राटदारांच्या हव्यासापोटी जाणूनबुजून अडवून ठेवल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगर पालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या 59 डीपी रस्त्यांची कामे मागील नऊ महिन्यांपासून जाणूनबुजून रखडवून ठेवली आहेत. या कामांना प्रशासकीय 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी प्राप्त झालेली असून, नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आवश्यक होते. परंतु अद्यापही या कामांना सुरूवात झालेली नाही. 06 जानेवारी 2025 रोजी नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याची कामे तात्काळ चालु करणेसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांनी सदर कामांचे निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे व सदर कामे  28/02/2025 रोजी पर्यंत प्रत्यक्ष सुरू करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले. सदर आंदोलनामुळे 7 महिन्यापासुन रखडलेल्या निविदा उघडण्यात आल्या. परंतु सदरील निविदा प्रक्रिया कंत्राटदारांच्या हव्यासापोटी 15 ते 16 टक्के जास्तीच्या दराची निविदा मंजुर करण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या आडून कंत्राटदार नगर पालिका प्रशासनावर दबाव आणत आहेत. सदर कामे ही नगरोत्थान योजनेतील असल्याने 25 टक्के हिस्सा नगर पालिकेला भरावा लागतो. ह्या 15 ते 16 टक्के आगाऊची निविदा मंजूर केल्या तर विनाकारण नगर परिषदेवर जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देऊन सदरील कामे तत्काळ सुरु करण्याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद धाराशिव यांनी आदेशित करावे. अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने 15/04/2025 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, प्रवीण कोकाटे, रवि वाघमारे, राजाभाऊ पवार,प्रदीप मुंडे,उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, खलील सय्यद, सिद्धार्थ बनसोडे, प्रशांत साळुंके, बंडू आदरकर, गणेश खोचरे, पंकज पाटील, दिनेश बंडगर, प्रशांत पाटील, बिलाल कुरेशी, अभिषेक पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top