धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सैफअली सुलेमान सय्यद यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने 8 मार्चला फोन करून त्यांच्या क्रेडिट कार्डवर ॲमेझॉन व फ्लिपकार्टवर खरेदीची ऑफर असल्याची बतावणी केली. ऑफर लागू करण्यासाठी ओटीपी घेतला. सैफअली सुलेमान सय्यद यांनी ओटीपी सांगताच काही क्षणात सय्यद यांच्या क्रेडिट कार्डमधून 1 लाख 90 हजार 52 रूपये काढल्याचा संदेश धडकला.
त्यावेळी सैफअली सय्यद यांनी 9 मार्च रोजी सायबर पोलिस ठाणे गाठून एनसीसीआर पोर्टलवर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर धाराशिव सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता सदरची रक्कम ॲमेझॉन पेवर वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ॲमेझॉन पे नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सदर रकमेतून दीपेंद्रसिंग कुमार याने मुथूट पापाचान स्वर्णवर्शम या कंपनीकडून ऑनलाईन दोन तोळे सोन्याचे कॉईन खरेदी केले असून, ब्ल्यु डार्ट या कंपनीद्वारे वाराणसीत (उत्तरप्रदेश) डिलिव्हरी होणार असल्याचे सांगितले. मुथूट पापाचान स्वर्णवर्शम व ब्ल्यु डार्ट यां कपंनीच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणुकीतील रक्कमेतून खरेदी केलेले दोन तोळे सोन्याच्या कॉईनची ऑर्डर रद्द करण्याची सुचना केली. त्यांनी ऑर्डर रद्द करून 12 मार्च रोजी रक्कम सैफअली सय्यद यांच्या खात्यावर 1 लाख 90 हजार 52 रूपये परत पाठवले. ही कामगिरी सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या पथकाने केली.