कळंब (प्रतिनिधी)- येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नक्कल काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची खासगी व्यक्तींकडून लूट होत असून, ती थांबविण्याची मागणी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, निजाम काळापासून  कळंब, भूम व वाशी तालुक्यातील जमिनीच्या दस्त नोंदणीचे रेकॉर्ड दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. तिन्ही तालुक्यातील नागरिक विविध कारणांसाठी जमीन दस्त नोंदणीच्या नक्कल काढण्यासाठी कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज घेवून येत असतात काही जणांना आपल्या जमिनी नोंदणी दस्ताची सत्यप्रत नक्कल तत्काळ पाहिजे असते. तर काही जणांना दस्तांचे नंबर माहिती नसतात. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत कळंब दुय्यम निबंधक कार्यालयात काही खासगी व्यक्ती घेत आहेत. येथील दुय्यम निबंधक कार्यालयात काही खासगी व्यक्ती हे स्वतः अधिकारी, कर्मचारी म्हणून कार्यालयाच्या अभिलेख (रेकॉर्ड) रूमच्या चाव्या स्वतः जवळ ठेवतात. सुटीच्या दिवशी कार्यालयात अभिलेख रूम उघडून कार्यालयाचे अभिलेख तपासत आहेत. येणाऱ्या अर्जदारांकडून 500 ते 5 हजार रूपयांचे शुल्क घेत आहेत. जे अर्जदार कार्यालयातील खासगी व्यक्ती, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देत नाहीत, त्यांना नक्कल लवकर मिळत नाही. कर्जदारांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात. 

या प्रकाराकडे संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणाकडे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडे येथील ॲड. समीर मुल्ला यांनी तक्रार दाखल केली. त्यात दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची लुट थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच येथील दुय्यक निबंधक कार्यालयात खासगी व्यक्तींना प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी लवकरात लवकर चौकी होवून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबवावी. 

 
Top