धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील घाटंग्री येथे कौटुंबिक व शेतीच्या कारणातून खुनाची घटना घडली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी दि. 4 फेब्रुवारी रोजी मृतदेह थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलिसांची परेशानी झाले.
यावेळी दोन तास गोंधळ सुरू होता. घाटंग्री येथील केशव महादेव हराळे, महादेव रावण हराळे, वैष्णवी केशव हराळे, सहदेव प्रभू हराळे, राजुबाई महादेव हराळे, हणुमंत शहाजी हराळे यांनी रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुग्रीव बाबू थोरात यांच्या घरासमोर कल्पना दिलीप हराळे (40) यांचे सासरे एकनाथ भीमा हराळे यांना लाथाबुक्क्यांसह रॉड, काठी, दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. कल्पना यांच्या फिर्यादीवरून सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मात्र उपचारादरम्यान एकनाथ हराळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी एकनाथ यांचा मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयात आणला.
मृतदेह शववाहिकेतच ठेवण्यात आला होता. या प्रकारामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात तब्बल दोन तास गोंधळ उडाला. नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय तसेच आणखी आरोपींची नावे समाविष्ट केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत तेथेच ठिय्या दिला. नंतर अपर पोलिस अधीक्षक हसन गौहर यांनी सर्वांना गुन्हा दाखल करण्याचे आश्वासित करून कारवाई सुरू केली. तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह परत नेला.