धाराशिव (प्रतिनिधी)- बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या येडशी अभयारण्यातुन नागमोडी वाट काढत पुढे जाणारी नॅरोगेज रेलगाडी, पिसारा फुलवून नाचणारे मोर, धबधब्याचा कर्णमधुर आवाज, कोणाचेही लक्ष वेधून घेणाऱ्या माकडांच्या उड्या, गुरुकुलमध्ये वनौषधींवर सुरू असलेली पारंपरिक प्रक्रिया, त्याच्या जोडीला शंभरहून अधिक वर्ष जुने असलेले दुर्गादेवी हिलस्टेशन आणि मनाला अपूर्व शांताता देणारे श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान. येडशी अभयारण्य म्हणजे मराठवाड्याचे माथेरानच ! अगदी माथेरानच्या धर्तीवर व्यापक स्वरूपात पर्यटनस्थळ म्हणून हा सगळा परिसर विकसित करण्यासाठी, त्यातून रोजगार निर्मिती आणि मोठी अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव शहरापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर पौराणिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्वपूर्ण असे रामलिंग तीर्थक्षेत्र आहे. येडशी अभयारण्यातील हा परिसर म्हणजे मराठवाड्याचे माथेरान होय. दरवर्षी श्रावणात लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येतात. नजीकच्या काळात या संख्येत मोठी वाढ होत आहे. पर्यटकांची वाढती संख्या ध्यानात घेऊन त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण करणे, मंदिर परिसराचा व्यापक विकास करणे आणि एक संपन्न हिलस्टेशन म्हणून जगभरातून पर्यटक याठिकाणी यावे यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठीच या सर्व परिसराला पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी केली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

राज्यभरात मोठ्या आदराने आणि सन्मानाने येडशी अभयारण्यातील आर्यसमाजच्या गुरुकुलचे आजही नाव घेतले जाते. काही अडचणी आणि असुविधांमुळे आज ते बंद पडण्याचा मार्गावर आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वनौषधींची झाडे आहेत. त्यापासून गुरुकुलमध्ये पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करून औषधी बनवली जात. त्याला देशभरात मोठी मागणी होती. तसेच संस्कृतमधून याठिकाणी निवासी शिक्षण दिले जात पुन्हा नव्याने या सर्व बाबींना पूर्ववत करण्याचा मानस असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले.

ऐतिहासिक लातूर-मिरज या नॅरोगेज रेल्वेमार्गावर शंभर वर्षाहून जुने दुर्गादेवी हिलस्टेशन आजही मोठ्या दिमाखात उभे आहे. धुरांच्या रेषा हवेत काढत धावणारी रेलगाडी आणि भोवताली निसर्गाचा अभूतपूर्व अविष्कार निश्चितच पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. 100 वर्षापूर्वीची अनुभूती पर्यटकांना मिळावी यासाठी त्याच पद्धतीने याठिकाणी पुनर्विकास  करण्याचे ठरले आहे. दुर्गादेवी हिलस्टेशनलगत पूर्वी विठ्ठलवाडी नावाचे गाव होते. जुन्या काळात गाव जसे होते अगदी तसेच साकारून याठिकाणी नॅरोगेज जुनी रेलगाडी त्याचे इंजिन आणि जुन्या पद्धतीचे डबे आणून माथेरान प्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून एक रमणीय व अविस्मरणीय पर्यटन केंद्र विकसित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

अभयारण्यात जंगल सफारी ट्रेल्स, तंबू टाकून राहण्यासाठी ठिकाण, पाणवठे , इथल्या मातीत बारमाही हिरवी आणि तजेलदार राहणारी वृक्षसंपदा, गवताळ भागातील प्राण्यांसाठी सुरक्षित वातावरण, आदी अनुषंगिक कामांचाही या आराखड्यात गंभीरपणे विचार करण्यात येणार आहे. तसेच हे सर्व करीत असताना स्थानिकांचा यात सहभाग महत्वपूर्ण सहभाग राहणार आहे त्यासाठी एक सुकाणू समिती गठीत करण्यात येईल. स्थानिकांसह पर्यटन विकास समितीचे  सदस्यही त्यात असतील. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि या भागातील अर्थकारणाला बळकटी मिळावी यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्ह्यातील जे महत्वपूर्ण 15 प्रकल्प आपण हाती घेतले आहेत. त्यापैकीच हा एक प्रकल्प असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.


 
Top