धाराशिव (प्रतिनिधी)- ऊसतोड व बांधकामावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कर्नाटकामध्ये नेवून अत्याचार करणाऱ्या धाराशिव येथील नराधमाला 10 वर्षे सक्तमुजरी व 21 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हकीम मेहबुब काझी (रा. रामनगर, सांजा रोड, धाराशिव) असे आरोपीचे नाव असून, तो विवाहित आहे. त्याला तीन अपत्यही आहेत. सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीत पीडितेची नैसर्गिक साक्ष, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. सचिन सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या पूर्वी दोन वर्षापासून आरोपी हकीम मेहबुब काझी व पीडितेचे कुटुंब एकत्र ऊसतोड कामगार म्हणून विविध ठिकाणी काम करीत होते. दरम्यानच्या काळात काझीने पिडीतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ऊस तोडीचे काम संपल्यानंतर आरोपीने पीडितेस व तिच्या आईस एका बांधकाम मिस्त्रीकडे मजूर म्हणून काम मिळवून दिले. 7 मे 2019 रोजी आरोपी पीडितेला अपसिंगा येथील शेतात घेवून गेला. त्यानंतर तेथून बसने हुमनाबाद (कर्नाटक) येथे नेले. तेथे गेल्यानंतर येथे माझ्या ओळखीचे खून लोक आहेत, असे सांगत तिला बुरखा घालण्यास दिला. तेथून जहीराबाद येथे घेवून गेला. त्या ठिकाणी काझीने पीडितेस त्याच्या लहान मुलांसोबत रूमवर 26 मे 201 पर्यंत ठेवले. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेवर वारंवार लैगिंक अत्याचार केले.
दरम्यान 7 मे 2019 रोजी पीडिता कामावरून परत आली नाही म्हणून आईने तिचा शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. बांधकाम मिस्त्रीकडून माहिती मिळाल्यावरून पिडीतेच्या आईने आरोपी हकीम काझीच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरून आरोपी विरूध्द धाराशिवच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपास पोलिस उपनिरीक्षक डी. व्ही. सिध्दे व एस. जी. भुजबळ यांनी पूर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.