धाराशिव (प्रतिनिधी)- अपघाताचा बनाव करुन खुन लपविण्याचा आरोपीचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास केल्यामुळे गुन्हेगार 24 तासाच्या आत बीड जिल्ह्यातून पकडले गेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक रात्रगस्तीवर असताना त्यांना पोलिस स्टशेन वाशी हद्दीत घुलेचा मळा शिवारात सोलापूर- बीड हायवेवर एक इसम मयत अवस्थेत पडला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली असता आजूबाजूची परिस्थिती पाहून पोलीसांना घातपात झाला असल्याचा संशय आला. यातील मयत मुस्तकीन जब्बार शेख रा. साळेगाव ता. केज जि. बिड, ह.मु. मोहा ता. कळंब असल्याचे ओळख पटल्याने तात्काळ त्याचे नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांचेकडून मयताची अकबर नावाचे इसमाबरोबर काही दिवसापुर्वी भांडण झाले असल्याचे समजले. प्राप्त माहितीवरुन तात्काळ तपासाची सुत्रे हलविली असता संशयित म्हणून अकबर सरदार शेख, रा.पिंपनेर, ता.जि. बीड याचे नाव समोर आले. सदरबाबत पोलिस स्टेशन वाशी येथे गुरनं 39/2025 कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना सदरबाबत माहिती देवून त्यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे तात्काळ संशयित आरोपीचे शोधकामी रवाना झाले. मौजे पिंपळनेर, ता.जि. बीड येथे जावून पथकाने संशयित इसमाची माहिती काढून त्याला शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याचा भाउ अमर शेख, वडील सरदार शेख आणि दाजी फारुख शेख सर्व रा. पिंपळनेर, ता. जि. बीड यांचे मदतीने यातील मयत त्यांचे बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन वाशी शिवारात नेवून मारुन टाकले असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने तात्काळ नमुद 04 आरोपी व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले 02 मोटार सायकल ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईकामी पोलिस स्टेशन वाशी येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार शौकत पठाण, फहरान पठाण, जावेद काझी, चालक पोलीस अंमलदार रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.