धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाची पूर्ण क्षमतेने गाळप करुन सांगता करण्यात आली. प्रथम गळीत हंगामात तब्बल 1 लाख 2 हजार मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले. पुढील हंगामात विक्रमी गाळप करण्याचा संकल्प कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

धाराशिव तालुका व लातूर भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन श्री.आप्पासाहेब पाटील यांनी साखर/गूळ पावडर कारखाना उभारण्याची संकल्पना व्यक्त केली होती. त्यांच्या संकल्पनेला एनव्हीपी शुगरची उभारणी करुन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी मूर्त स्वरुप दिले आहे. या कारखान्यामुळे धाराशिव तालुक्यातील ढोकी, तेर, जागजी, कोंड व इतर भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाची चिंता मिटली आहे. विशेषतः कारखान्याला ऊस गाळपास दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ऊसबिल खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकर्‍यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

प्रारंभी कारखान्याचे मार्गदर्शक श्री.आप्पासाहेब पाटील, चेअरमन श्री. नानासाहेब उर्फ बालाजी पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. एनव्हीपी शुगर कारखान्यास ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे अत्यंत कमी कालावधीत 1 लाख 2 हजार मे.टन यशस्वी गाळप करू शकलो. गेल्या दोन गाळप हंगामापासून ऊस दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकर्‍यांचा विश्वास एनव्हीपी शुगरने संपादन केला असल्याचे प्रतिपादन यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री.पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यकारी संचालक श्री.कृष्णा पाटील, जागजी येथील प्रगतशील शेतकरी राजाभाऊ देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी  जयवंत रोहिले, विजय वाघे, चीफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चीफ केमिस्ट उमेश बिक्कड, लेबर ऑफिसर दत्तात्रय गायकवाड, सेल ऑफिसर सागर शिंदे, पर्चेस अधिकारी रविकांत जोगदंड, इ.इंजिनिअर प्रविण यादव, प्रविण पाटील, गोडाऊन किपर शुभम सावंत, वाहतूक ठेकेदार तुळशीदास जमाले, किरण कुर्‍हाडे, रामेश्वर आरळकर, नवनाथ लोंढे, बालाजी भोसले, ऋषिकेश गायकवाड, अविनाश भोरे, शेतकी विभागाचे संभाजी चोरमले, अक्षय माने, कौस्तुभ शिंदे तसेच सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



वाहतूकदारांचा बक्षिसाने सन्मान

प्रथम गळीत हंगामात एनव्हीपी शुगरला ऊस वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम भजनदास लाला जमाले, (2009 मे. टन), द्वितीय  पिंटू बन्सी काळे (1652 मे. टन), तृतीय रोहिदास आप्पाराव पवार  (1586 मे. टन), तसेच डबल मिनीमध्ये प्रथम गणेश रुपचंद काळे  (1244 मे. टन), द्वितीय लखन बर्‍या शिंदे  (1155 मे. टन), तृतीय गणेश शिंदे (1083 मे. टन) या सर्व वाहतूक ठेकेदारांचा बक्षिस देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.


चांगल्या प्रतीची लागवड करुन ऊस पुरवठा करा - चेअरमन पाटील

एनव्हीपी शुगर प्रा.लि.मार्फत कारखान्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेस पगार तसेच ओव्हरटाईम व सुट्टी पगार येत्या 31 मार्चवर ठरल्याप्रमाणे देण्यात येणार आहे.  2025-26 चा खूप मोठा गळीत हंगाम असून त्या दृष्टीने तोडणी-वाहतूक करार लवकर चालू करण्यात येणार आहेत. तसेच शेतकर्‍यांनी चांगल्या प्रतीचा ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक आणि ऊस तोडणी कामगार आणि विशेषतः कारखान्याच्या प्रशासनावर विश्वास ठेऊन आपला ऊस कारखान्याला घालणारे सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधव या सर्वांचे आभार यावेळी चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी व्यक्त केले.

 
Top