धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारने 4 हजार 892 रूपये हमीभाव देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात 21 खरेदी केंद्र सुरू केले होते. या हमीभावास शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. सर्व खरेदी केंद्रावर सोयाबीनचे कट्टे घेवून शेतकऱ्यांनी वाहनांसह मोठ्या रांगा लावल्या होत्या. दि. 6 फेब्रुवारी रोजी खरेदी केंद्राची शेवटची तारीख होते. त्यानंतर केंद्र बंद होणार असा सरकारचा आदेश असल्यामुळे मुदत वाढ मिळेल म्हणून शेतकरी वर्ग मोठ्या आशाने खरेदी केंद्राच्या बाहेर वाहनांच्या रांगा लावून बसलेला होता. परंतु सरकारने मुदतवाढ न दिल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयात राहिलेले सोयाबीनचे कट्टे टाकू असा इशारा शाम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यात 4 लाख 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. जवळपास 7 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात सोयाबीनला किमान सहा रूपये भाव देवू असे जाहीर केल्यामुळे शेतकरी वर्गात आशेचा किरण निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या वाढती मागणीनुसार राज्य सरकारने राज्यात हमीभाव देवून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले होते. पूर्वी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 दिली होती. परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही तारीख परत 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात 47 हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंद केली होती. त्यापैकी 37 हजार शेतकऱ्यांची सोयाबीनची हमीभावाप्रमाणे खरेदी झाली आहे. उर्वरित ऑनलाईन नोंदणी केलेल्या 12 हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन जाग्यावरच असल्यामुळे शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे. सरकारने सोयाबीन हमीभाव केंद्र परत चालू करावे अशी मागणी होत आहे.
निवेदन वर पाठविले
जिल्हा मार्केटींग फेडरेशनमध्ये काही शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा या मागणीसाठी आले होते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या चार-पाच दिवसापासून आम्ही वाहनांसह रांगेत आहोत. ऑनलाईन पध्दतीने आमची नोंदणी आहे. त्यामुळे आमचे हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी होती. परंतु दि. 6 फेब्रुवारी ही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची शेवटची तारीख होती. सरकारच्या आदेशानुसार सध्या हे सर्व खरेदी केंद्र बंद झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिलेले खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे निवेदन वर पाठविण्यात आले आहे.
मनोजकुमार बाजपेयी
जिल्हा मार्केटींग ऑफिसर