धाराशिव (प्रतिनिधी)- दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळणारा निधी हा केवळ दलित वस्तीतच खर्च होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी.असे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी दिले.
दि. 3 फेब्रुवारी रोजी शिंगोली विश्रामगृह धाराशिव येथे नगर परिषद धाराशिवच्या दलित वस्तीच्या विकासकामांच्या खर्चाबाबत,लाड पागे समिती व अनुकंपा नियुक्तीबाबत आढावा घेतांना आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत व धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लोखंडे म्हणाले,दलित वस्त्यांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत का याचा आढावा यावेळी घेण्यात आला.काही ठिकाणी अद्याप पाणीपुरवठा, स्वच्छता,रस्ते,गटार यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचे भेटीदरम्यान निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले. निधीचा योग्य वापर करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी मंजुरी प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचे श्रीमती फड यांनी सांगितले. आयोगाच्या सदस्यांनी या समस्या गांभीर्याने घेतल्या आणि येत्या काही महिन्यांत पुन्हा दौरा करून कामांची पाहणी केली जाईल, असे सांगितले. तसेच नगर परिषदेला दलित वस्त्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.