धाराशिव(प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी येथील ज्येष्ठ गांधीवादी नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतराव यशवंतराव वीर (वय - 91 वर्षे) यांचे बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचे जिल्हा परिषद सदस्य सहकारी होते. तसेच त्यांनी जिल्हा होमगार्डचे समादेशक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व काँग्रेस कमिटीचे धाराशिव शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांच्या पार्थिवावर आळणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.