धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा प्रशासन व वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जल अभियानची उत्साहात सुरवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा प्रशासन धाराशिव आणि वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. जलव्यवस्थापनासाठी स्पर्धात्मक वातावरणाला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील गावे जलस्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करू शकतील. ही स्पर्धा धाराशिव जिल्ह्यातील सर्व गावांसाठी खुली असून 28 फेब्रुवारी पर्यंत जलस्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वनामांकन करता येईल.
धाराशिव जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडलेल्या भव्य उद्घाटन सोहळ्याला धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमधील एकूण 250 ग्रामस्थ उपस्थित होते. या जल अभियान आणि जलस्पर्धेचे उद्घाटन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते झाले. या जल स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी त्यांनी याप्रसंगी गावकऱ्यांना आवाहन केले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर, आत्माचे प्रकल्प संचालक खंडेराव सराफ, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जल संधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, स्वच्छ भारत अभियानचे प्रकल्प अधिकारी हनुमंत गादगे, टाटा सामजिक विज्ञान संस्थेचे प्रा. गणेश चादरे, ग्रामविकास समिती सचिव दिपाली जाधव, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे खंदारे आदींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करुन व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. वॉटर संस्थेचे डॉ. ईश्वर काळे यांनी प्रस्ताविक केले.
अशी आहेत बक्षिसे
वॉटर संस्था आणि संस्थेच्या वॉटर सेंटर फॉर रेजिलिएन्स स्ट्डीज या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वॉटर गवर्नन्स स्टँडर्ड या टूलच्या आधारावर स्पर्धेतील सहभागी गावांचे मूल्यांकन केले जाईल. वॉटर गवर्नन्स स्टँडर्ड टूलच्या मूल्यांकनाद्वारे मिळणाऱ्या वॉटर स्कोअरच्या आधारावर निवडलेल्या 3 गावांना रोख बक्षिसे व स्मृतीचिन्ह प्रथम 5 लाख रुपये, व्दितीय 3 लाख रुपये आणि तृतीय 1 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी गावांना त्यांचे जल व्यवस्थापन सुधारण्यासाठी नियोजन आराखडे मिळणार आहेत.