धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना क्रमांक 2 चे एकूण सहा टप्पे आहेत. त्यातील टप्पा क्रमांक 1 ते 5 घाटणे बॅरेज ते रामदरा तलाव ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा व लोहारा या तीन तालुक्यांना मोठा लाभ होणार आहे. या तीन तालुक्यातील एकूण 10862 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टप्पा क्रमांक 6 मधील कामांना प्राधान्यक्रमात मंजुरी देण्यात यावी आणि ही कामे तातडीने सुरू करावी अशी आग्रही मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. त्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरवा कंदील दिला असून, मागणी केलेली टप्पा क्र. 6 मधील कामांच्या सर्वेक्षण, संकल्पन व अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही हाती घेण्याबाबत त्यांनी बुधवारी आदेशीत केले आहे. त्यामुळे रामदरा ते बोरी-एकुरगा या टप्पा क्र. 6 मधील पाणी वितरणाच्या कामाला आता वेग येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कृष्णा खोरे व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आग्रही मागणीवरून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सिंदफळ येथील पंपगृहातून तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात लवकरच कृष्णा खोऱ्यातील पाणी दाखल होत आहे. रामदरा येथून हे पाणी बोरी-एकुरगा आणि तेथून बंद पाईपलाईनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतशिवारात जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
7 हजार 78 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
याद्वारे तुळजापूर तालुक्यातील 2,874 हेक्टर, उमरगा तालुक्यातील 2,057 हेक्टर व लोहारा तालुक्यातील 2,147 हेक्टर असे एकूण 7,078 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टप्पा क्र.6 मध्ये निर्माण होणारे 7,078 हे. सिंचन क्षेत्र हे उपसा सिंचन योजना क्र.2 च्या एकूण प्रकल्पिय 10,862 हे. सिंचन क्षेत्राच्या 65% इतके आहे. या टप्प्यात 1 पंपगृह, उर्ध्वगामी नलिका व 85 किलोमीटर लांबीच्या बंद पाईपलाईन कामाचा समावेश आहे. शाश्वत सिंचनामुळे आता कायम पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांच्या दरडोई उत्पन्नात लक्षवेधी वाढ होवून जीवनमान उंचवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
असे होणार पाण्याचे वितरण
सिंदफळ येथील पंपगृहातून रामदरा तलावापर्यंतचा पाचवा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. पुढील पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यांतील साधारणतः सात हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी साधारणपणे 85 किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंथरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रामदरा येथील पंपगृहातून उपसा सिंचन पध्दतीने पाणी उचलून बोरी-एकुरगा गावापर्यंत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेले जाणार आहे. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाईपलाईनद्वारे हे पाणी वाटेत येणाऱ्या आठ तलाव आणि दोन बॅरेजेस मध्ये भरून घेतले जाणार आहे. अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.