धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 10 जानेवारी रोजी आयोजित 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये कथाकथन सत्र पार पडले. सहभागी कथाकारांनी सरस विनोदी कथा सादर करून साहित्यप्रेमींना  लोटपोट हसविले. कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील दिगंबर कदम हे होते.

हिंगोली येथील कथाकार शीलवंत वाढवे यांनी 'पिंजरा आणि शिंपला' या कथेचे विनोदी शैलीत सादरीकरण केले. गरिबीचा, असहायतेचा फायदा घेऊन ग्रामीण परिसरातील मुलींना लग्नाचे आमिष दाखवून परप्रांतीय फसवत आहेत. त्याचे रॅकेट कार्यरत असल्याचे वास्तव त्यांनी  विनोदी शैलीत सादर केले.

ज्योती सोनवणे यांनी 'पेरलं तेच उगवतं' ही कथा सादर केली.  आजच्या मुलांना आई-वडील नकोसे झाले आहेत. त्यांना सांभाळणे नकोसे वाटत आहे. पण ते हा विचार करत नाहीत की आपण आपल्या आई वडिलांना सांभाळायचे नाही. तर आपली मुलं आपल्याला कसे सांभाळतील?

कथाकथन सत्राचे अध्यक्ष दिगंबर कदम यांनी ग्रामीण संस्कृतीतील प्रकार असलेल्या 'पांगुळ' या कथेतून देवाचे नाव घेऊन ग्रामसंस्कृती जतन करणारा कलावंत. आजकालची मुलं त्याची नक्कल कशी करतात याचे उदाहरण विनोदी पद्धतीने मांडून श्रोत्यांना पोट धरून हसवले. कथाकथन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. महेंद्र चंदनशिवे तर आभारप्रदर्शन विपुल काळे यांनी केले. 

 
Top