धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील वरवंटी गावात मोठा राजकीय बदल घडला असून, उपसरपंच मैमुना हुसेन शेख आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत 2 फेब्रुवारी रोजी हा प्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात उपसरपंच मैमुना हुसेन शेख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत भागवत देशमुख, राणूबाई श्याम सरवदे आणि कालिदास मारुती देडे यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार राणा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी आमदार राणा पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, वरवंटी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश म्हणजे गावाच्या विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. गावातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक सुविधा यांसारख्या क्षेत्रांत भरीव विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वरवंटी गावातील हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक पातळीवर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रवेशामुळे गावातील सत्ता समीकरणांवर काय परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.