धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय संविधानात मानवी मूल्यांची जोपासना करण्यात आलेली आहे; ज्यांनी संविधान वाचले नाही ते विरोध करतात आणि काहीजण त्यांना समर्थन देतात असे मत ज्येष्ठ विचारवंतांनी परिसंवादात मांडले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 10 जानेवारी रोजी आयोजित 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये 'संविधानाचा अमृतमहोत्सव आणि मानवी मूल्ये' विषयावर ज्येष्ठ विचारवंत तथा माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. यात माजी प्राचार्य डॉ. अशोकराव अशोकराव नाईकवाडे, प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. शिवानंद भानुसे सहभागी झाले होते.
डॉ. अशोकराव अशोकराव नाईकवाडे म्हणाले की, राज्यघटनेची बांधणी देशातील तत्कालीन संघर्षातून झालेली आहे. वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे जात राज्यघटनेला पूर्णत्व आले. अनेक टप्पे पार केल्यानंतर ब्रिटिश अखेर राज्यघटनेला मान्यता देण्यास तयार झाले. त्यानंतर भारतीय इतिहास, रूढी परंपरा यांचा परामर्श घेऊन मसुदा तयार करण्यात आला. राज्यघटनेचे मध्यवर्ती सार हे भारतीय संविधानात आहे. मानवतावादी विचारांचा दूरदृष्टीने संविधानात केलेला असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांनी, ज्यांनी संविधान वाचले नाही ते विरोध करतात आणि काहीजण त्यांना समर्थन देतात. म्हणून प्रत्येकाने संविधानाचे वाचन केले पाहिजे. वैश्विक शांतता प्रस्थापित करण्यासाठी घटना लिहिण्यात आलेली आहे. महात्मा गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि छत्रपती शिवरायांचा पराक्रम ही भारत देशाची ओळख आहे. मानवी मूल्येही घटनेत आहेत. त्यामुळे घटना समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
डॉ. नागोराव कुंभार म्हणाले, भारतीय राज्यघटनेतील सर्व मूल्ये चिरकाल टिकणारी आहेत. काळाच्या कसोटीवर टिकणारे आपले संविधान आहे. नैतिक समाज निर्मिती करणारे, मानवी कल्याणाचे संविधान हे साधन आहे. घटना चालविणाऱ्यांवर घटना कशी आहे, हे सिद्ध होते. राज्यकर्त्यांनी घटनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांकडे समदृष्टीने पाहावे असेही त्यांनी नमूद केले. परिसंवाद सत्राचे सूत्रसंचालन नवाब जहागीरदार तर आभारप्रदर्शन मयुरी काळे यांनी केले.