धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावे. असे मत राज्याचे सहकार मंत्री तथा  10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटक बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात, देशात सहकारामुळेच मराठवाड्याची ओळख आहे.  राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी माझ्याकडे आली आहे. त्यामुळे सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि  महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवार, दि. 10 जानेवारी रोजी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, विशेष अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे, प्राचार्य अनिल काळे, सौ. अनुराधाताई  काळे, सौ. शुभांगीताई काळे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


पुढे बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, स्व. शिक्षक आमदार वसंतराव काळे हे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन विद्यापीठाच्या चळवळीतून उदयास आले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षकांबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रखर लढा दिला. वसंतराव यांच्यानंतर त्यांचा वारसा आमदार विक्रम काळे हे तितक्याच ताकदीने पुढे चालवीत आहेत. शिक्षकांबरोबर समाजातील विविध प्रश्नावर ते लढा देत आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या २१ टीएमसी पाण्यासाठी देखील ते काम करत आहेत हे विशेष.


अजितदादा पाटील हे धडाडीचे उपमुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. लोकसभेला फटका बसला तेव्हा सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला. या राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. सहकाराबरोबर शिक्षण क्षेत्रातही केंद्र आणि राज्य सरकारला प्रभावीपणे काम करायचे आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील साखर कारखाने, सूतगिरणी, दूध, शेती क्षेत्रातही प्रभावीपणे काम करून  उर्जितावस्था देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.



ताट आणि वाटी असं आमचं नातं!

 आमदार विक्रम काळे व आमचे नाते ताट आणि वाटी असे आहे. माझ्यानंतर विक्रम काळे यांनाच संधी आहे. आता त्यांना मंत्री होऊन जाऊ द्या. कार्यकर्त्याना कसे समजून घेतले पाहिजे हे आमदार काळे यांना चांगले ठाऊक आहे. त्याची दखल श्रेष्ठी नक्कीच घेतील असे सांगून पुढील काळात आमदार विक्रम काळे यांच्या मंत्रिपदाचे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.



कष्टकरी हाच देशाचा कणा - संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे

कष्टकरी हाच देशाचा कणा आहे. समाजाच्या विकासात कष्टकऱ्यांचे मोठे योगदान आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे असे विचार अध्यक्षीय भाषणात

संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला देखील धक्का लागणार नाही अशी ताकीद आपल्या सैन्याला दिली होती. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची शेतकऱ्यांप्रती असलेली भावना लक्षात येते. संत परंपरेतील सर्व संतांनी समाजाच्या हितासाठी जागृती केली. या परंपरेतील संत गोरोबा काका देखील याच भूमीतील आहेत. स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया घातला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महात्मा फुले यांनी त्याकाळी आसूड ओढले. 'शेतकऱ्यांचा आसूड' यात त्यांनी एका शेतकऱ्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. महापुरुषांमुळेच महाराष्ट्र घडला आहे. ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेणे कठीण काम आहे. परंतु आमदार विक्रम काळे हे सहकाऱ्यांच्या मदतीने दहा वर्षांपासून संमेलनाची परंपरा यशस्वीपणे चालवत आहेत. साहित्य संमेलनातून महाराष्ट्राच्या भूमीत अनेक दिग्गज व्यक्तीमत्वे घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.




ग्रामीण भागात साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी संमेलन -  स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे

ग्रामीण भागात साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि  महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी स्व. आ. वसंतराव काळे यांच्या स्मृतीनिमित्त मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. स्व. आ. वसंतराव काळे यांनी काम केले. त्यामुळेच त्यांच्यानंतर पहिल्याच पोटनिवडणुकीत मला संधी दिली. त्यानंतर सर्वानी सतत सहकार्य केले म्हणून चौथ्यांदा आमदारकीच्या निवडणुकीत विजयी केले. तरीदेखील मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त करून आमदारकीत मी ज्येष्ठ असलो तरी बाबासाहेब वयाने ज्येष्ठ असल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या संधीला आपण समर्थन दिले. असे सांगून संमेलनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण भागात जनजागृती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.



विशेष अतिथी आत्माराम टेंगसे यांनी राज्य सरकारने शिक्षकांचे आर्थिक प्रश्न आणि अनुदान व इतर समस्यांकडे लक्ष द्यावे जेणेकरून आमदार विक्रम काळे यांचे काम सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. विजय फुलारी यांनी नवोदित साहित्यिकांसाठी ग्रामीण साहित्य संमेलने उपयुक्त असून साहित्यिकांसाठी स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत व्यक्त केले.



तत्पूर्वी  शिक्षणमहर्षी वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व वृक्षाला पाणी घालून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा भव्य पुष्पहार घालून भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन सतीश हाणेगावे तर आभारप्रदर्शन अनिल काळे यांनी केले. संमेलनास मराठवाड्यातून आलेले साहित्यिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संमेलनासाठी गंगाधर आरडले, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, बालाजी तांबे, राजकुमार मेढेकर, विपुल काळे, रणवीर काळे व किसान परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. 

 
Top