धाराशिव (प्रतिनिधी)- अपप्रवृत्तीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबीत राहिलेल्या नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुक्रवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी शुभारंभ झाला. अनेक वर्षापासून रखडलेला हा विषय आता मार्गी लागला असून, या रस्त्यावर ये-जा करणारे गावातील नागरिक, अक्कलकोटला जाणारे भाविक व नळदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरहुन नळदुर्ग - अक्कलकोट महामार्गावरून अक्कलकोटकडे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक या रस्त्याचा वापर प्राधान्याने करतात. पर्यटक देखील नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी याच मार्गाने ये - जा करतात. या रस्त्यासाठी अधिकची जागा व त्यांचा मोबदला हा विषय स्वतंत्र ठेवून अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या रस्त्याची उपलब्ध रुंदी कायम करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यास मा. उच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने सातत्यपूर्ण प्रयत्नातून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रुपये 4 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. सुमारे 10.80 किमी लांबीच्या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया पुर्ण करुन 7 मार्च 2024 मार्चला कामाचा कार्यरंभ आदेशही निर्गमीत करून दुरुस्तीला सुरुवात केली होती. मात्र ठराविक व्यक्तींच्या विरोधामुळे पुन्हा दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले होते. ते आता पुन्हा वेगात सुरू करण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.