धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकार (दिल्ली) च्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ फेलोशिप साठी संपूर्ण महाराष्ट्रातून वाद्य संगीतासाठी, पुण्यामधले प्रतिभावंत संवादिनी वादक सुरेश फडतरे यांची निवड झाली आहे. 2 वर्षांसाठी ही फेलोशिप प्रदान केली जाते.
फडतरे यांचे संगीतातील प्राथमिक शिक्षण धाराशिव येथील दीपक लिंगे यांच्याकडे झाले. त्यानंतर गुरुवर्य पं. अप्पासाहेब जळगावकर यांचे ते गंडाबंध शिष्य झाले. त्यांच्याकडे 12 वर्ष गुरुकुल पद्धतीने, गुरूची सेवा करत संवादिनी वादनाचे शिक्षण त्यांनी आत्मसात केले. आप्पांचे ते मानसपुत्रच झाले. संगीतामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. फडतरे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. गायकी अंगाने सोलो हार्मोनियम वादनामध्ये ते पारंगत आहेत.
पंडिता किशोरी आमोणकर, पं अजय पोहनकर, पं वेंकटेश कुमार, पं मुकुल शिवपुत्र यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांना दर्जेदार साथ त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे व्हायोलिन, बासरी, सतार ह्या वाद्यांबरोबर जुगलबंदी ही ते प्रस्तुत करत असतात. सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमधून आपली कला सादर करुन त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे.
पं सी. आर. व्यास रसिक मंचातर्फे दिला जाणारा कला गौरव पुरस्कार, संगीत उपासना गौरव पुरस्कार, प्रभात कल्चर युवा पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित फडतरे संवादिनी हे वाद्य तरुणांमध्ये रुजवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. अनेक शिष्यांना ते मार्गदर्शन करत असुन गुरू पं अप्पासाहेब जळगावकर ह्यांच्याकडून मिळालेला शुद्ध शास्त्रोक्त वादनाचा वारसा ते पुढे न्हेत आहेत.