तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी दारी शेतातील रबी पिकातील नव्याने पहिले आलेले धान्याचे कणसासह धाट लावुन शेतकऱ्यांनी नव्याची आकडी पोर्णिमा बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी साजरी केली. ही अनोखी परंपरा पुरातन असुन आजही मनोभावे पाळली जाते.
श्रीतुळजाभवानी माता ही शेतकरी कष्टकरी यांची देवी म्हणून प्रसिध्द आहे. श्रीतुळजाभवानी भक्तात शेतकरी भक्त मोठ्या संखेने आहे. शेतकरी आपल्या शेतात उगवलेले व काढणीस आलेले पहिले पिक ज्वारी, गहु, करडी सह अन्य धान्याचे कणसासह श्रीतुळजाभवानी मातेच्या मुख्य गर्भगृह असलेल्या चोपदार दरवाजा, कडी दरवाजा, होमकुंड व निंबाळकर दरवाज्या माघ पोर्णिमे दिनी लावुन मगच काढणी कामास आरंभ करतात. आपल्या शेतातील धान्य रुपी सेवा शेतकरी माघ पोर्णिमा दिनी देवीदारी धान्य कणस धाट सह लावून करतात. मगच रबी पिक काढण्यास आरंभ करतात. तसेच शेतातुन आलेले धान्यातील गहु, ज्वारी याचा नैवध देविस दाखवुन मगच शेतातील धान्य खाण्यास विकण्यास आरंभ करतात. शेतकरी वर्गाची श्रीतुळजाभवानी प्रती असणारी श्रध्दा यामुळे दिसुन येते. आज श्रीतुळजाभवानी मंदीरात शेतकरी भक्तांची मोठी गर्दी होती. श्रीतुळजाभवानी दारी शेतातील नवे पहिले धान्याचे धाट लावल्यानंतर तो आपल्या घराचा प्रवेशव्दारावर ही लावतो.