उमरगा (प्रतिनिधी)- पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. याचा दाखल विविध गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होत आहे.
घरफोड्या, जबरी चोरी, शेती व बांधकाम साहित्य, शेतमाल, केबल, वीज पंप, दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना पाहता येथील कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे.
उमरगा हे सीमावर्ती भागातील महत्वाचे पोलीस ठाणे आहे. तसेच हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे पोलिसांना सतर्क रहावे लागते. शहरासह 74 गाव, वाडी, तांड्या मधील 2 लाखांच्या घरात लोकसंख्या आहे. कायदा सुव्यवस्था व संरक्षणासाठी पोलीस ठाण्या अंतर्गत पाच बीट, दोन दुरक्षेत्र आहेत. सन 1989 च्या मंजूरी नुसार 5 अधिकारी, 106 पोलीस कर्मचारी यांची पदे मंजूर आहेत. सध्या एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकासह फक्त 60 कर्मचार्यावर कारभार हाकला जात आहे. यातील चालक 4, उपविभागीय कार्यालयाशी संलग्न 2, न्यायालय 2, कोषागार कार्यालय 2, सिव्हिल हॉस्पिटल 2, पिकेट 2, समन्स व वॉरन्ट 04, तर 18 कर्मचारी ठाण्यात, आजारी रजा 3, प्रसूती रजा 2, एक मयत तर दररोज सहा ते सात जणांची साप्ताहिक सुट्टी असल्याने बोटावर मोजण्या इतक्या कर्मचार्यावरच पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. याचा परिणाम दाखल विविध गुन्ह्याच्या तपासावर होत आहे. गुन्ह्याचे वाढते प्रमाण पाहता येथील कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे. पोलिसांकडून जनतेच्या रक्षणाची अपेक्षा करणारे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत मात्र मौन बाळगून आहेत.