उमरगा (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या आदेशा प्रमाणे महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करीता शिक्षण क्षेत्रात सर्वत्र वेगाने हालचाली सुरू आहेत. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करीता सक्रीय रहावे असे आवाहन बीड येथील अशासकिय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मेघराज पंडित यांनी केले आहे.
23 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे राज्यातील अशासकिय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटेनेचे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी मेघराज पंडित व जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यानी धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना भेटी दिल्या. शहरातील आदर्श महाविद्यालयात पंडित बोलत होते. यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष मोरे, जिल्हा सरचिटणीस डॉ शिरीष देशमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य के टी कांबळे, बाळासाहेब साळुंके, शिवाजी जगताप, राजेंद्र पतगे, प्रभाकर माने, अनिल तुंगे उपस्थित होती.
राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करीता प्रामाणिक पुढाकार घेण्याची गरज आहे. पुणे येथे रविवार दि 23 फेब्रुवारी रोजी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनातील एनएपी अर्थात न्यू एज्यूकेशन पॉलीशी या विषया वरील कार्यशाळेच्या प्रशिक्षणा करिता शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संघटनेच्या वतीने उमरगा लोहारा तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटी देण्यात आल्या. प्रास्ताविक मारूती कदम यांनी केले. सुत्रसंचलन श्रीधर नरसुरे यांनी केले. के टी कांबळे व प्रभाकर माने यांनी आभार मानले. अंजली केळगांवकर, सचिन जगताप यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.