धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आरोग्य सुविधाची प्रचंड अनास्था आहे. अश्यावेळी या आंकाक्षित जिल्ह्यातील एमआरआय व सीटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. धाराशिव जिल्हा रुग्णालय येथील एमआर आय मशीन इचलकरंजी येथे तर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथील सीटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलविण्याचा अंत्यत चुकीचा निर्णय घेण्यात येत आहे. या सुविधा पूर्ववत सुरु करा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
आरोग्याच्या सुविधासाठी सामान्य रुग्णाना सोलापूरला जावे लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्याची सेवा अधिक सक्षम करण्याऐवजी, आहे त्या सेवा बंद करण्याचा निर्णय कोणाच्या आहे याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती तर या सरकारकडून सुधारत नाही किमान आहे त्या सुविधा सुरु ठेवण्यातही आरोग्य विभाग कमी पडत असल्याच दुर्देवाने म्हणावे लागेल. सामान्य रुग्णालयावर अवलंबून असलेला इथला रुग्ण खाजगी दवाखान्यात अश्या महागडया सेवावर खर्च करु शकत नाही. एकीकडे जिल्हा कायम दुष्काळात होरपळत आहे दुसरीकडे शासन पातळीवर कायम जिल्ह्यावर सापत्न भावाची वागणूक मिळत असते. त्यात आता तर थेट आरोग्याच्या सुविधाच काढून घेण्याची हिंमत सरकारने केली आहे. हा प्रकार सहन करण्यापलीकडे आहे. त्यामुळं हा घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करून या सुविधा पूर्ववत सुरु कराव्यात. अशी मागणी आमदार पाटील यांनी मंत्री आबिटकर यांच्याकडे केली आहे.