धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा स्कूलबस सुरक्षा समितीची बैठक आज 18 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
नगर परिषद प्रशासन धाराशिव यांनी निश्चित केलेल्या 17 थांब्यांवर त्वरित सांकेतिक फलक लावण्याचा आणि शिक्षण विभागाने त्याची पडताळणी करण्याचा निर्णय झाला. तसेच ज्या शाळांकडे स्वतःच्या स्कूलबस आहेत, त्यांना बस पार्किंग शाळेच्या आवारातच करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळांच्या स्कूल बसमध्ये महिला सहवर्ती कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले.
स्कूलबस परिवहन समितीने बसचे भाडे आणि वाहनांची वैध कागदपत्रे यांची तपासणी करावी,असे ठरवण्यात आले.महाराष्ट्र स्कूलबस (स्कूलबसकरिता विनियम) नियम 2011 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना नियमांची माहिती व्हावी यासाठी “स्कूलबस धोरण-2011“ शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली माहिती पुस्तिकेचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.ही पुस्तिका जिल्ह्यातील सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना वितरित केली जाणार आहे.
बैठकीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव हर्षल डाके यांनी प्रस्तावना केली. विनोद भालेराव (विभाग नियंत्रक,राज्य मार्ग परिवहन महामंडळ), श्रीमती आर.एस.मैंदर्गी (उपशिक्षणाधिकारी,प्राथमिक), डी. एस.लांडगे (उपशिक्षणाधिकारी,माध्यमिक), बी.डी.देवगुडे (वि.अ.शि.), सचिन बेंद्रे (सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा), दादासाहेब गवळी (सचिव,जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना), प्रमोद मगर (कार्याध्यक्ष,जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना) आणि जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.