वाशी (प्रतिनिधी)- अजिंक्य विद्यामंदिर,वाशी येथे बाल आनंद मेळावा तसेच हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन स्त्री रोग तज्ञ डॉ. उमादेवी बाराते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चव्हाण व्ही. जे.,वंदना कवडे व श्यामल कवडे (नगरसेविका न. पं. वाशी), संस्थापक श्रीधर पवार, प्राचार्य लक्ष्मीकांत पवार,मुख्याध्यापिका मनीषा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात संक्रांतीनिमित हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला होता यामध्ये 700 महिलांनी सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. बाल आनंद मेळाव्याचा उद्देश पाल्यांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन जागृत करणे, तसेच भविष्यात व्यावसायिक बनवणे हा होता. याप्रसंगी 390 स्टॉल च्या माध्यमातून दोन लाख रुपयांची उलाढाल झाली. कोणाला नफा झाला तर कोणाला तोटा.यातून मुलांना आपले पालक करत असलेल्या व्यवसायात किती कष्ट आहेत हे पण समजले.आनंद मेळाव्यात चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थांचा सर्वांनीच आस्वाद घेतला. ग्रामीण भागातील मुलांनी आणलेल्या रानभाज्या,विविध प्रकारचा रानमेवा कृषिप्रधान संस्कृतीचे दर्शन घडवत होता.
याप्रसंगी डॉ.उमादेवी बाराते, बीट अंमलदार वाशी बाळासाहेब औताडे, श्रीधर पवार संस्थापक अजिंक्य क्रीडा मंडळ वाशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.