तुळजापूर (प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आमदार अभिमन्यू पवारांची कार्यकर्त्यांसह औसा येथून बुधवारी निघालेली पदयात्रा (दि.3) जानेवारीला तुळजापूर येथे पोहचली. ढोलताशांच्या गजरात आमदार अभिमन्यू पवार व पत्नी शोभाताई अभिमन्यू पवार व मुलगा ॲड. परिक्षीत अभिमन्यू पवार यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी दर्शन घेत नवसपूर्ती पुर्ण केली आहे. तीन दिवस 60 किलोमीटर पायी चालत हि पदयात्रा गुरूवारी सायंकाळी संपली आहे. यावेळी मोठय़ा संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1 जानेवारीला हि पदयात्रा औसा येथून निघाली होती. 1 तारखेला आशीव मुक्कामी तर 2 तारखेला धाराशिव जिल्ह्यातील ताकविकी येथे मुक्कामी असा पायी प्रवास करीत 3 जानेवारीला तुळजापूर येथे पोहचली अत्यंत नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने हि तीन दिवसाची पदयात्रा शुक्रवारी सायंकाळी तुळजाभवानीच्या दर्शनाने पुर्ण झाली. दरम्यान औसा विधानसभा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा निघाल्यापासून औसा व धाराशिव जिल्ह्यातील विविध गावात नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत ज्या ठिकाणी पदयात्रा पोहचेल त्याठिकाणी फटाके फोडून स्वागत केले. दरम्यान शुक्रवारी आमदार अभिमन्यू पवार, शोभाताई अभिमन्यू पवार, ॲड परिक्षीत अभिमन्यू पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेत नवसपूर्ती केली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सपत्नीक आई तुळजाभवानीची पुजा करून नवसपूर्ती केली.
तीन वर्षांपासून पदयात्रा काढून त्यावेळेच्या ठाकरे सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी याचना करीत राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा नवस केला होता.नवस पुर्ण झाल्यास औसा ते तुळजापूर नवसपूर्ती पदयात्रा काढणार असल्याचा नवस बोलला होता. दरम्यान आई तुळजाभवानीच्या कृपेने हि नवसपूर्ती पुर्ण झाली असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.तसेच महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि माझा नवस पूर्ण झाला, म्हणून मी पायी औसा ते तुळजापूर नवसपूर्ती पदयात्रा पुर्ण केल्याचे सांगितले.
स्थानिक आमदाराची नवसपूर्ती पदयात्रेच्या स्वागताला अनुपस्थिती नागरिकांत चर्चेचा विषय
आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे व देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्री तुळजाभवानी मातेला नवस केला होता. त्याची नवसपुर्ती करण्यासाठी काढण्यात आलेली पदयात्रा तुळजापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सदर पदयात्रेच्या स्वागताला स्थानिक भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे गैरहजर होते. तसेच पाटील परिवारातील एकही सदस्य या पदयात्रेच्या स्वागताला हजर नव्हता एवढंच नाहीतर या पदयात्रेचे स्वागत करणारे फ्लेक्स बोर्ड, स्वागत कमानी सुद्धा लावण्यात आल्या नव्हत्या. स्वतःला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील विश्वासू आमदार म्हणून मिरवीणारे राणा पाटील हे मंत्रीपद न मिळाल्याने पक्षात नाराज आहेत की काय अशी उलट सुलट चर्चा कार्यकर्ते व नागरिकांतून सुरू आहे.