धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2025 “परवाह“अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांनी 1 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले.
2 जानेवारी 2025 रस्ता सुरक्षेसंबंधित माहिती पुस्तकाचे वाटप रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत पोलीस मोटार विभाग धाराशिव येथील कर्मचारी व वाहन चालक यांना करण्यात आले. रस्त्यावरून दुचाकी चालवत असताना हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करण्याबाबत मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय नकाते,सुजीत वाघमारे, लोमटे व क्षिरसागर, वाहन चालक उपस्थित होते.
2 जानेवारी रोजी ब्रेक टेस्ट ट्रॅक या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व वाहनमालक व नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियान 2025 “परवाह“ अंर्तगत मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय पांडकर यांनी रस्त्यावर चालणा-या दुचाकीधारकाने हेल्मेट परिधान करावे व चारचाकी वाहनधारकांनी सीटबेल्टचा वापर करावा व ज्या ठिकाणी अपघात होतो. त्याठिकाणी अपघात झालेल्या व्यक्तिना मदत करावी. तसेच रस्त्यावर वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये याबाबत उपस्थित सर्व चालक व नागरिकांस सूचना व मार्गदर्शन केले. येडशी टोलनोका या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक पूनम पोळ यांनी चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले. तसेच तेथे बॅनर प्रदर्शित करून माहिती पत्रके वितरीत करण्यात आली. या वेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक सागर कासवीद व डी.आर. रावते उपस्थित होते.