कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगारात अनेक बस चा खुळखुळा झाल्यामुळे त्या बस नेहमी नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे वाहक चालकांना दररोज ड्युटी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशासह वाहक चालकातून जोर धरत आहे. तर आहे त्या बस गाड्या घेवून काही चालक, वाहक डिट्युटीसाठी गेले असता बस आगारातील डिझेल पंप नादुरूस्त असल्याने बसेस जागेवर उभा करण्याशिवाय पर्याय नव्हता.
गेल्या अनेक वर्षापासून कळंब आगाराला एकही नवीन बस उपलब्ध न झाल्यामुळे सर्व संसार हा जुन्याच बस वर सध्या चालू आहे. त्या बस वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वरिष्ठ पातळीवर बस दुरुस्तीसाठी सामान उपलब्ध होत नसल्यामुळे यांत्रिक कर्मचारी परेशान झाले आहेत. बस नादुरुस्तीचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक वाहक, चालकांना दिवटी पासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच ड्युटी न मिळाल्याने त्यांना रजा देऊन घरी रिकाम्या हाताने परतावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ सध्या आलेली आहे. यावर प्रशासनाने काहीतरी तोडगा काढून सर्व कर्मचाऱ्यांना समान काम आणि दाम या धोरणानुसार सर्वांना कशा पद्धतीने कामकाजासाठी वापरणार याकडे लक्ष प्रशासनाने देण्याची गरज आहे. अनेक वाहक, चालक असे आहेत की एकाच दिवशी दोन वेळेस प्रत्येकाला ड्युटी दिली जाते. तर काही वाहक, चालकांना दिवसाला एकही दिवटी मिळत नसल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच कळंब आगारात बसमध्ये डिझेल टाकण्यासाठी दोन पंप उपलब्ध असून ते पंप नेहमी नादुरुस्त आहेत. त्यामुळे अनेक बस गाड्या या केवळ डिझेलमुळे एकाच जागेवर काही तास उभा राहतात. त्यामुळे अनेकदा वाहक, चालक सह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.